१६ व्या मजल्यावरून खाली पाहत होतो, कुठे अंगण दिसतंय का ते ?

0
33

“अंगण शोधतो आहे…………!!!!!”

“तुम्ही काय रे काय खेळता ते पब्जी आणि काय काय आमच्या सारख्या आट्यापाट्यांची सर नाही रे त्या मोबाईल ला…….वाट लावली साली सगळी…..”


“तुमचं ते जुनंच काहीतरी……” मी नेहमी प्रमाणे टाळलं आणि आत जाऊन बेडवर पडलो……पुन्हा एकदा मोबाईल मध्ये डोकं खुपसून……..पण काही केल्या लक्ष लागेना…..मनात फक्त एकच विचार घोळत होता…. हे आट्यापाट्या म्हणजे काय……??
काहीसा अस्वस्थ होऊन एकदम बाहेर गेलो…….
“काय रे असा काय आलास पटकन…???”
“पप्पा ते आट्यापाट्या म्हणजे काय…? ”
माझ्यातली अस्वस्थता बोलत होती…..
” आट्यापाट्या होय…. बस….. सांगतो…!! वही पेन दे……”
पटकन कागद आणि पेन आणला….


हे बघ असे चुन्याने पट्टे आखायचे आधी… आणि मग समोरासमोर रांगेत ठराविक अंतर धरून उभं राहायचं…. आणि समोरच्या टीम मधला गडी मधून धावत जाणार……”
पप्पा सांगतच सुटले…. माझी नजर त्या खेळापेक्षा पप्पांकडेच जास्त खिळली होती….
रात्र भर खेळायचो आम्ही…..होळी दिवाळी आली की खेळाला रंग चढायचा…आई खूप ओरडायची…कधीतरी ढोपर फुटल्यावर आधी मारायची आणि मग हळद चेपायची… ही बघ जखम……….”
माझी नजर त्यांच्या ढोपरावरच्या जखमेकडे होती…आणि त्यांची नजर समोरच्या हार घातलेल्या आजीच्या फोटो कडे होती……….”

पप्पांना पहिल्यांदा डोळे भरलेलं पाहिलं होतं…..
पटकन त्यांचा हात हातात घेतला… जोरात दाबला………
” पप्पा……..!!!!!!”
माझ्या या हाकेनंतर मिनिट भर शांतता होती…. जस काही घरातल्या माणसांसोबत भिंती टेबल इतर वस्तू पण पप्पांच्या आठवणी ऐकायला उत्सुक होत्या…..

पप्पांच्या हातातला कागद ह्या मधल्या मिनीटभरात खाली पडला होता…. पेन निसटून गेला होता……

“आम्ही खरे जगलो रे!!!!….त्या मोबाईल ने ह्या आठवणी जगता येणारा नाहीत रे!!!! जा खेळा भांडा मारामारी करा…
भरपूर बोला……कोळश्याने चौकोन आखून लंगड्या खेळा…खुर्च्या ठेवून खो-खो खेळा……लपाछपी खेळा… दगड गोळा करून लगोरी खेळा……..जगा रे थोड्या आठवणी जगा….. अंगणात जाऊन उड्या मारा….मनसोक्त उड्या मारा…. पण खेळा रे खेळा!!!!!!!”
पप्पा फक्त खेळ सांगत नव्हते तर खेळासोबत जगलेले क्षणसुध्दा सांगत होते….. सांगता सांगता ते स्वतःही जगत होते…….”

आयुष्य
आयुष्य

माझं लक्ष त्यांच्या डोळ्यांकडे गेलं….. डोळ्यातून आठवणी पाझरत होत्या.
डोळ्यातून येणार पाणी हे आठवणींच जितकं होत तितकंच हे क्षण पुन्हा येणार नाहीत ह्याचही होत…….
” आजही मैदान बघितलं की एकदम आमचे दिवस आठवतात…. पाय थकलेत रे आता , पण मनात अजून तोच जोर आहे…. आज पण कधीकधी चुन्याचे पट्टे पाहिले की आट्यापाट्या आठवतात…….. तुमच्याकडे सगळं आहे रे!!!! वेळ आहे,उत्साह आहे……खेळायच वय आहे….जगा रे आताच जगा……प्लिज जगा रे……हे पुन्हा नाही येणार…….”
माझ्याही डोळ्याला एव्हाना धार लागली होती…….
तेवढ्यात मोबाइलची रिंग वाजली… त्या एका रिंगने पप्पा एकदम आठवणीतून वास्तवात आले………..मी पटकन उठलो आणि एकदम डोळे पुसले… ह्या आठवणींनी हातातला मोबाईल केव्हाच भिरकावून दिला होता…
तडक उठून दार गाठलं…….उघडलं………….

“कुठे चालला रे ?????”
एकदम पप्पांनी विचारलं

” खेळायला !!!!….”
“पण कुठे खेळणार???……”
पुन्हा प्रतिप्रश्न आला…..

हाताश होऊन घातलेले चप्पल काढून गॅलरी मध्ये जाऊन उभा राहिलो………..
१६ व्या मजल्यावरून खाली पाहत होतो, कुठे अंगण दिसतंय का ते ?????????????……………

:- आशिष शेडगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here