“वाळवाण…!” (धान्याची वाळवणं)

0
72
वाळवाण
वाळवाण

बऱ्याचदा जुन्या गोष्टी नव्याने पहाताना मनाला एक वेगळाच आनंद होत असतो…! जुन्या गोष्टी आपल्याला आठवणीत घेऊन जातात,व आपणही त्या आठवणींनी सुखावून जातो..!माझ्या बाबतीत असच कांहींस घडलं..

“वाळवाण” हि त्यापैकीच एक गोष्ट..!

"वाळवाण...!" (धान्याची वाळवणं)
“वाळवाण…!” (धान्याची वाळवणं)

मागच्या आठवड्यात गावाकडं गेलो तेंव्हा, सोयाबीन,भुईमूग काढणी जोरात चालू होती..
माळावर,गल्लीत,मारुतीच्या देवळाजवळ जशी जागा असेल तिथं “वाळवाण” घातलेलं दिसत होतं..!

आता यात नवीन काय असं वाटेल.. पण लहानपणी “वाळवाण” म्हटलं की काय काय करावं लागायचं ते आठवलं..

धान्याची वाळवणं
धान्याची वाळवणं

खळ्यावर मळणी झाली की धान्य घरी आणलं जायचं आणि मग त्याची “वाळवणी” चालू व्हायची…
याच्या रखवालीच काम म्हातारी माणसं नाहीतर आम्हा पोरांच्याकडे असणार…
सकाळी प्लास्टिकच्या पट्टीवर किंवा शेणान सारवलेल्या जमिनीवर मोठी माणसं धान्य ओतून, आम्हाला धान्य पसरवाय लावायची ..ते पण एकच धान्य नाही भात, शेंगा,मिरच्या चवळी,मूग हे सगळं वेगवेगळं पसरून घेतलं कि त्याला पोत्याची वळकुटी लावायची..! बाजूला विठा दगड ठेवायचे..

आता खर काम सुरु व्हायचं रखवालीच..हातात काठी घेऊन, म्हसर (गुर) तोंड घालणार नाहीत याची..व कोंबड्या,पाखर,कुत्री “वाळवाण”विस्कटणार नाहीत याची राखण करायची…!
जास्त त्रास कोंबड्यांचा व्हायचा..जवळ दगड घेऊनच बसाव लागायचं..कारण पसारा मोठा असायचा,एकाचवेळी दहा वीस पोती धान्य..

पाखरांचा त्रास होऊ नये म्हणून,फुटलेल्या आरशाचे तुकडे “वाळवाणात” मधी मधी ठेवायचो, त्याचे किरण डोळ्यावर आल्याने पाखर येत नव्हती..
कधी कधी फेरी वाल्यांचा त्रास पण असायचा..
तासा दोन तासांनी “वाळवाणात” पाय फिरवाय लागायचे,ज्यामुळे धान्य खालीवर व्हायचे..

“वाळवाण” गल्लीत असेल तर दारात बसून रखवाली,मग जेवण पाणी जागेवर असायचं..तेच शेतात खळ्यावर असेल तर झाडाखाली किंवा खोपीत बसून रखवाली करावी लागायची..सोबत जेवणाचं गाठोड पाण्याची कळशी घेऊनच जायचं..!
वाट्त इतकं सोपं काम नव्हतं हे..यातून पळवाट नसायची जबाबदारीच काम,त्यात आणि वादळ -वार सुटलं,पावसाचं वातावरण झालं की गडबड घाई व्हायची..पटापट धान्य गोळा करा पोती भरा, बैलगाडीत ठेऊन घरी घेऊन जा..या सगळ्यासाठी खूप माणसं लागायची.. लहानपणी शालेय जीवनात,सुट्टीत खूप काम करायचो आम्ही..

आज “वाळवाण” बघताना मला माझ्या आजीची आठवण झाली..सगळं धान्य गोळा झालं तरी मातीत पडलेलं एक एक धान्य पण वेचून घ्यायला लावायची आजी…

कापडाची पुरचुंडी करून,सुपात घेऊन पाखडून,चाळणीने चाळून सगळं धान्य गोळा करायची, प्रत्येक दाणा महत्वाचा आहे असं सांगायची

“जास्त हाय म्हणून उतूमातू नका ,पिशवीतन किलु किलून आनाय लागलं तवा कळलं तुमास्नी…”
असं म्हणायची आजी…

आज पिशवीतून धान्य आणताना आजी बोललेलं आठवत..,कणगी,तट्या भरून ,पोत्यांनी धान्य असतानाही तिनं कधीच अन्नधान्याची नासाडी केली नाही व करूही दिली नाही..
आज मशीनवर मळणी होते,शेतात मशीन नेऊन जागेवर मळणी करतात,पोती भरली जातात व ट्रॅक्टर नी धान्य घरी येत..! त्यामुळे खळ,मळणी,कणगी,तट्या असे शब्द,आता अडगळीत गेले..
मशीनवर मळताना धान्य कितीतरी सांडतअसत, पडून जात, तरी कोणी पुरचुंडी करून धान्य वेचताना दिसत नाही आज…!

त्या काळातील सुगीचे दिवस,मळणी,व “वाळवाण” आज मला नव्याने आठवले..

माझ्यासारख्याच गावापासून दूर असणाऱ्या माझ्या मित्राना या भूतकाळातील जुन्याच आठवणी पण नव्या नजरेतून….!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here