क्षण मोहरे मन बावरे वाट ही बघ तुझीच पाहते

0
47

क्षण मोहरे मन बावरे….! संध्याकाळची वेळ होती सूर्य अस्ताला निघाला त्यातच पावसाची थोडी भुरभुर ही होऊन गेली होती. कधी शांत,स्वच्छ, निरभ्र आकाश तसच कधी ढगाळलेले ,काळसर,धो-धो बरसणार आणि कधी कडाडणार आभाळ किती पैलू असतात ना या आभाळाचे…..!

आयुष्यही अगदी असच ….कधी अगदी शांत,तर कधी वेदनेने ढगाळलेले,कधी आनंदाअश्रूंनी तर कधी दु:खाश्रुनी बरसणार……! आयुष्याच्या किती तऱ्हा …. कधी कधी अगदी हातात सामावलेल,तर कधी वाटावं वाळूप्रमाणं हातातून निसटून चाललं आहे…! मी पण या सगळ्याचा एक भाग आहेच की पण तरीही त्यांच्यापासून दूर आहे. अस होत ना ? सगळ्यामध्ये असूनही आपण तिथे नसतो ….मला माझ्या अवतीभवती घडणारी प्रत्येक गोष्ट कळत होती पण तरीही या वरवर वाटणाऱ्या माझ्या या शांत मनात आत कुठेतरी हुरहुर होती माहीत नाही का? मग आठवणी,विचार ,भावना, त्या अनोळखी व्यक्तीची उणीव अस सगळं एकामागोमाग यायला लागत….

आज या सूर्यास्ताच्या वेळच आकाश वेगवेगळ्या अन आकर्षक रंगानी भरलेलं होत. मधूनच येणारी वाऱ्याची छोटीशी झुळूक तो अंगावर शहारा आणणारा वारा सगळं विलक्षणच …..पण तरीही मलाच कळत नव्हतं की मला काय होतंय त्यामुळे दुसऱ्याला तरी कस आणि काय सांगणार? काही वेळा मनाच्या अंतरंगातल्या काही गोष्टी उसळी मारून वर येतात की त्या कोणाला सांगताही येत नाही.बर मग ऐकणारी व्यक्ती मला समजून घेणारी हवी ….अस होऊ शकत हे मानणारी हवी …. आणि सगळ्यात महत्वाचं हे असं का वाटतंय या मागचं कारण न विचारणारी हवी …हे एवढं सगळं एकाच व्यक्तीत सापडणं जरा अवघडच आहे पण मग मी विचार केला आपणच आपल्याशी मोकळं व्हावं आत्मसंवाद करावा.कारण जेव्हा आपण आपल्याशी मोकळे होतो तेव्हा प्रामाणिक असतो ज्या काही भावना येत असतील त्या न लपवता आपण आहे तशा स्वीकारतो ……

आणि मग माझा माझ्याशीच सवांद सुरु झाला या क्षणाला मला खुप ऐकट वाटत होतं मला या वेळी कुणाची तरी गरज होती.हातात हात घेऊन प्रेमानं विचारपूस करणारा ‘तो’ आज या क्षणाला हवा होता .ते म्हणतात ना एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सगळे जण असतात पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला बरोबर हवी असते.कधी कधी तो हवा हा विचारच हट्ट धरायला लागतो .मग काय करावं आशा वेळी काही सुचत नाही .तो नसतानाही त्यानं हा माझा क्षण व्यापून टाकलाय याचा मला थोडा रागही येतो .त्याची ही आठवण कधी सुखावते तर कधी ऐकट असल्याची जाणीवही करून देते.पण मग आकाशातले तारे ,पाखरांचा स्वर,पानातून वाहणारा वारा, असंख्य फुलांचा संमिश्र सुवास,ओलसर मातीचा गंध ,सुंदर सुर्यास्ताचा देखावा ….अशा कितीतरी गोष्टी नजरेसमोरून जातात.आणि मग वाटत याच सगळ्या गोष्टींनी तर माझं आयुष्य व्यापलेल आहे……. हृदयाची ही तहान अशा भावनिक गोष्टीसाठीच तर आसुसलेली असते ही तहान पाणी शमवू शकत नाही त्यासाठी संवादाची आणि त्याच्या ओलाव्याची जास्त गरज असते….. आता वाटत प्रेमाच्या अनुभवासाठी हृदयाचं दार उघड ठेवावं लागतं आणि ते उघड आहे याचा सहज विसरही पडावा लागतो म्हणजे मग कुणीतरी अवचित एखाद्या क्षणी वाऱ्याच्या झुळुकी सारखा हळुवार येईल आणि माझ्या या क्षणातला सोबती बनेल…… पण सध्यातरी …… “क्षण मोहरे मन बावरे वाट ही बघ तुझीच पाहते” अशीच काहीशी माझी स्थिती आहे……!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here